छापा पडण्याच्या भीतीने गॅसवर जाळून टाकले ५ लाख रुपये
तेलंगानातील घटना; तहसीलदाराच्यावतीने घेतली होती लाच
हैदराबाद : लाच घेताना सापळ्यात अडकला तर ती व्यक्ती प्रथम पुरावे नष्ट करण्याचे उद्योग करते. तेलंगणात एका तहसीलदाराच्यावतीने लाच स्वीकारणार्या मध्यस्त दलालाने पकडले जाण्याच्या भीतीने लाच म्हणून घेतलेले पाच लाख रुपये पोलिसांच्या हाती लागू नयेत म्हणून चक्क गॅसवर जाळून टाकले. पण तरीही एसीबीच्या पथकाने पुरावे म्हणून अर्धवट जळालेल्या नोटा आणि संबंधित दलाल व तहसीलदारालाही अटक केली.
एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, वेलदाना मंडळाच्या तहसीलदारांनी एका प्रकरणात पाच लाख रुपयांची लाच मागिती होती. ही रक्कम त्यांनी आपल्यावतीने मध्यस्थाकडे देण्यास सांगितली होती. तक्रारदाराने याची तक्रार एसीबीकडे केली. त्याआधारे एसीबीच्या पथकाने मध्यस्थाच्या घरी छापा मारला. पण या छाप्याचा आधीच अंदाज आल्याने त्याने घराचा दरवाजा बंद करून लाच म्हणून घेतलेल्या पाच लाख रुपयांच्या नोटा गॅसवर जाळण्यास सुरुवात गेली.पथक त्याच्याजवळ पोहोचेपर्यंत ४६ हजार रुपयांच्या ९२ हजार रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. तर ५०० रुपयांच्या जवळपास २००० नोटा अर्धवट जळाल्या. एकूण पाच लाख रुपये त्याने जाळून नष्ट केले. एसीबीने मध्यस्थासह तहसीलदाराच्याही मुसक्या आवळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राजस्थानात एका सरकारी अधिकार्याने अशाच एका प्रकरणात १५ ते २० लाखांच्या नोटा जाळल्या होत्या.