चहा करून दिला नाही म्हणून पतीने दिला घटस्फोट
पत्नीने घेतली न्यायालयात धाव
गाझियाबाद : लग्न करण्यापेक्षा ते टिकवणे जास्त कठीण झाले आहे. कोणत्या कारणावरून पती-पत्नीचा काडीमोड होईल हे काही सांगता येत नाही. उत्तर प्रदेशात गाझियाबादमधील लोणी येथे एक तिहेरी तलाकचेप्रकारण समोर आले असून त्यात पत्नीने चहा तयार करून दिला नाही म्हणून पतीने चक्क दहा वर्षांचा संसार मोडून तिला तलाक देऊन टाकला. त्यामुळे पीडितेने वकिलांमार्फत कोर्टात अर्ज दाखल करून न्यायाची मागणी केली आहे. आता कोर्ट यात कोणती भूमिका घेणार याकडे पीडितेसह तिच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे. पीडितेच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार लोनी येथील महिलेचे लग्न दहा वर्षांपूर्वी लग्न रईसुद्दीन याच्यासोबत झाले होते. रईसुद्दीन हा रिक्षा चालवतो व त्यांना चार मुले आहेत.१३ जानेवारी रोजी त्याने पत्नीला चहा करण्याची ऑर्डर दिली. मात्र, काही कारणांनी चहा करण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्याने रागाच्या भरात तलाकचा तीनदा उच्चार करून तिला तलाक दिला व रागाच्या भरात रिक्षा घेऊन निघून गेला. सायंकाळी तो घरी आल्यावर पत्नीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता व त्याने तिला तलाक देण्याचा निर्णयही बदलला नाही. त्यामुळे महिलेने ठाणे गाठून पतीविरोधात तक्रार दिली.पण त्यांनी काहीच कारवाई न केल्याने तिने आता न्याय मिळावा म्हणून कोर्टात धाव घेतली आहे.