कुटुंबियांनीच काढली बलात्कारपीडितेची आरोपीसह धिंड
मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना; आरोपी जेरबंद
भोपाळ : मध्य प्रदेशात एक धक्कादायक पण तितकीच दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. राज्यातील अलीराजपूर जिल्ह्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन युवतीवर एका २१ वर्षीय आरोपीने बलात्कार केला. पण ही घटना घडल्यानंतर पीडितेला धीर देण्याऐवजी तिच्या कुटुंबीयांनीच तिची आरोपीसोबत दोरीने बांधून गावातून धिंड काढली. एवढेच नव्हे तर त्याचे व्हिडीओ, फोटो काढून ते सोशल मीडिातून शेअर केले. या जबर मानसिक धक्क्यातून सावरत पीडितेने ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बलात्कार करणार्या तरुणासह सहाजणांना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मध्य प्रदेशात अलीराजपूर जोबन ठाण्याअंतर्गत एका गावात २१ वर्षीय तरुणाने गावातील अल्पवयीन युवतीवर बलात्कार केला. यातील आरोपी हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याने मुलीला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. पण घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनीच संबंधित तरुणासोबत तिला दोरखंडाने बांधून त्या दोघांची गावातून धिंड काढली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून बलात्कारी तरुणासह सहा जणांना अटक करण्यात आल आहे. घटनेनंतर पोलीस पीडितेला सोबत घेऊन गेले असून तिला बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.