कोरोनानंतर जगात पुन्हा लागणार लॉकडाऊन? जगभरात सुरु आहे पूर्वतयारी... शेतकऱ्यांसाठी पुन्हा येणार मोठे संकट?
Mar 23, 2026, 09:08 IST
मुंबई (लाइव्ह ग्रुप नेटवर्क) : होय.. बातमीचे शीर्षक वाचून कुणाच्याही उरात धडकी भरेल. कोरोना काळात संपूर्ण जगाने लॉकडाऊन अनुभवला. शहरातल्या लोकांनी गावाकडे स्थलांतर केले, केवळ प्राथमिक गरजा पूर्ण करून उदरनिर्वाह करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. आता पुन्हा एकदा तशीच स्थिती निर्माण होते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. जगातल्या अनेक देशांनी तशी शक्यता गृहीत धरून पूर्वतयारी सुरू केली आहे.
मध्य पूर्वेतील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. 23 दिवस उलटून देखील कुणीही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. अमेरिका आणि इजरायलाच्या इराण सोबत सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम मात्र अख्या जगाला भोगावे लागत आहेत, त्यात भारताचा देखील समावेश आहे.भारताला पुरवठा होणाऱ्या कच्च्या तेलापैकी 70 ते 80 टक्के कच्चे तेल हे होमुर्जच्या सामुद्रधुनीतून प्रवास करून येते. इराणने या मार्गावर निर्बंध लादल्याने तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.
भारताने परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवली असली तरी जगातल्या अनेक देशांमध्ये मात्र परिस्थिती हाताबाहेर जात आहे. पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमती वाढल्या आहेत. महागाईची झळ अनेकांना सहन करावी लागत आहे, स्वतःला सामर्थशाली म्हणून घेणारी अमेरिका देखील यातून सुटलेली नाही. अमेरिकेत देखील इंधनाच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे अमेरिकेतील जनता युद्धाच्या विरोधात आहे. डोनाल्ड ट्रम्प च्या युद्धाच्या धोरणाचा निषेध करत अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान जागतिक इंधन तुटवण्याचा परिणाम आता सर्वच क्षेत्रांना भेडसावण्याची शक्यता आहे, युद्धामुळे आता सगळं काही महाग होत चालल आहे.
खते महाग होणार?
पिकांसाठी आवश्यक असलेली खते ही आखाती देशांमधून येत असल्याने अन्नसुरक्षा देखील धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना खतांसाठी अधिक पैसे मोजावे लागले तर अन्नपदार्थ देखील महाग होण्याची शक्यता आहे.
युद्धामुळे हवाई वाहतुकीला देखील फटका बसत आहे. इंधन महाग झाल्याने अनेक कंपन्यांनी उड्डाणे कमी केली आहेत. आवश्यक नसल्यास विमान प्रवास करू नका असे वेगवेगळ्या देशातील सरकारने सांगितले आहे. अशाच प्रकारची आवाहन कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात देखील करण्यात आली होती, त्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आले होते.
पून्हा लॉकडाऊन
दरम्यान आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने तेल दरवाढीच्या संकटापासून वाचण्यासाठी सुरक्षा या नावाने दहा कलमी योजना प्रसिद्ध केली आहे. या माध्यमातून विविध देशांच्या सरकारांना वाहन चालवण्यासाठी नंबर प्लेटच्या आधारावर दिवस निश्चित करण्याचे, वाहनांची वेगमर्यादा कमी करण्याचे आणि विमान प्रवास शक्यतोवर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गॅस एवजी इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम अशा सुधारणा आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने सुचवल्या आहेत. इराण मध्ये सुरू असलेल्या युद्ध आणखी काही दिवस चाललं तर तेलाच्या किमती आणखी वाढतील, वाहतूक उड्डाणे शेती सगळं काही महाग होईल त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या सूचना विविध देशात लागू केल्या जातील, असे झाल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन चा अनुभव जगाला घ्यावा लागणार आहे..