आम्ही अडवला मोदींचा ताफा; खलिस्तान समर्थकांची ऑडियो क्लिप व्हायरल
या फोन कॉलमध्ये पंजाबमधील मोदींच्या वाहतूक कोंडीची जबाबदारी आमची असल्याचा दावा शीख फॉर जस्टिस या खलिस्तान समर्थक संघटनेने केला आहे. यासंबंधीचे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे. वृत्तानुसार सर्वोच्च न्यायालयातील वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले, की युनायटेड किंग्डममधून मला दोन रेकॉर्ड फोन कॉल आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मोदींच्या सुरक्षेच्या याचिकेपासून दूर राहावं असं या फोन कॉलमध्ये सांगण्यात येत होतं.
पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला ब्लॉक करण्याची जबाबदारी देखील या संघटनेने घेतल्याचे या फोन कॉलमध्ये सांगण्यात आल्याचे विष्णू शंकर जैन यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालय मोदींच्या सुरक्षेवर सुनावणी घेत आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करू नका आणि मोदी सरकारला मदत करू नका. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी १९८४ चे हत्याकांड आठवावे. तुम्ही एकाही हत्याऱ्याला पकडू शकत नाही. सर्वोच्च न्यायालय मोदी सरकारला मदत करीत असेल तर ते सर्वात वाईट काम असेल, असेही ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.