... तर प्रेम कशाला केलंस? सुसाईट नोट लिहून प्रियकराने संपवले आयुष्य!

 
कानपूर ः तू माझ्यासोबत चांगलं केलं नाहीस... विश्वासघातच करायचा होता तर मग प्रेम कशाला केलं, असा प्रश्न करत प्रियकराने वसतिगृहातील खोलीत पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवले. पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केली असून, हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मूळचा जालौनचा रहिवासी होता. उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

शिवम ज्ञानेंद्रसिंह चौहान (२१, रा. उरई दहेखंड, जालौन) हा कानपूरच्या हितकारीनगरातील लालजी वाजपेयी होस्‍टेलमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. काल रात्री त्‍याच्या वडिलांनी वारंवार कॉल करूनही त्याने फोन उचलला नाही. त्‍यामुळे शिवमचे मामा पवन चंदेल यांनी होस्‍टेलचे संचालक लालजी वाजपेयी यांना माहिती दिली.

लालजींनी त्‍यांच्या मुलाला शिवमच्या खोलीकडे पाठवले असता त्‍याने आत्‍महत्‍या केल्याचे समोर आले. पोलिसांना कळवल्यानंतर ते घटनास्‍थळी आले. खोलीचा दरवाजा तोडून पंख्याला लटकत असलेला मृतदेह उतरवला. खोलीतील आरशाजवळील भिंतीवर एका तरुणीचा फोटो लटकवलेला होता. त्‍या फोटोमागे शिवमने लिहिले सुसाईड नोट समोर आली.

प्रेयसीने लिहिलेल्या धोक्‍याचा उल्लेख करताना त्‍याने चार ओळी लिहिल्या होत्या. तू माझ्यासोबत चांगलं केलं नाहीस... विश्वासघातच करायचा होता तर मग प्रेम का केलंस? माझ्यानंतर तिला त्रास देऊ नका... असा उल्लेख त्‍याने सुसाईड नोटमध्ये केला आहे. कल्याणपूर पोलिसांनी सुसाईड नोट आणि त्‍याचा फोन जप्‍त केला आहे.

शिवम तीन महिन्यांपूर्वी या वसतिगृहात राहायला आला होता. अतिशय शांत स्वभावाचा शिवम फारसा कोणाशी बोलायचा नाही. त्याचे फारसे कोणी मित्रदेखील नव्हते. शिवमच्या पालकांची तक्रार आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस निरिक्षक अशोक कुमार दुबे  यांनी सांगितले.