आता मुलींचे लग्नाचे वय २१ होणार!

केंद्रीय मंत्रिमंडळाची प्रस्तावाला मंजुरी
 
नवी दिल्ली : मुलींचे लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता यासाठी सध्याच्या कायद्यात सरकार सुधारणा करणार आहे.
मुलींना कुपोषणापासून वाचवण्यासाठी त्यांचे लग्न योग्य वेळी केले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात म्हणाले होते. सध्याच्या कायद्यानुसार मुलींचे विवाहाचे वय १८ तर मुलांसाठी २१ वर्षांची अट आहे. आता यासाठी हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. नीती आयोगाच्या जया जेटली यांच्या नेतृत्वाखालील एका टास्क फोर्सने या संबंधीची शिफारस केली होती. व्ही. के. पॉल या टास्कफोर्सचे सदस्य होते. याशिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव तसेच महिला आणि बाल विकास, शालेय शिक्षण साक्षरता अभियान, न्याय आणि कायदा मंत्रालयाचे विभाग सुद्धा या टास्क फोर्सचे सदस्य होते. जून २०२०  मध्ये या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. डिसेंबर २०२० मध्ये या समितीने अहवाल दिला होता. पहिल्या मुलाला जन्म देते वेळी महिलेचे वय हे किमान २१ वर्षे असावे, असे टास्क फोर्सने म्हटले होते.