अजानवेळी लाऊडस्पीकर बंद! इमामांच्या निर्णयाचे कौतुक!!

 

कोलकाता ः पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील मशिदीच्या इमामाने घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयाची सध्या देशभर चर्चा होत आहे. मशिदीमध्ये नमाजसाठी लाऊडस्पीकरचा वापर करणे त्‍यांनी बंद केले असून, मुलांना शिक्षण घेताना अजानमुळे त्रास होऊ नये म्‍हणून त्‍यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

मशिदीने मुलांच्या शिक्षणासाठी जागाही दिली आहे. मशिदीजवळच शाळा आहे. मशीद प्रशासनाच्या या निर्णयाचे शाळेचे शिक्षक इंद्रनील साहा यांनी स्वागत केले आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगम ते भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा यांनी या अजानच्या आवाजामुळे त्रास होतो आणि झोपमोड होते, अशी वक्‍तव्ये करून या विषयाकडे लक्ष वेधले होते. त्‍यावर अनेकांनी टीकाही केली, काहींनी समर्थनही केले. त्‍यानंतर मशिद प्रशासनानेच घेतलेला हा निर्णय समोर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुस्लिम समुदायाचे सर्व जण कौतुक करत असून, मुलांच्या शिक्षणासाठी हा स्तुत्य निर्णय झाल्याचे लोकांचे म्‍हणणे आहे.