तिला अंतर देणे असे पडले महागात... प्रेयसीने आधी घेतले चुंबन, नंतर प्रियकरावर झाडली गोळी!

 

कोलकाता : रागाच्या भरात कोण काय करेल याचा काही नेम नाही आणि हा राग जर प्रेमसंबंधाच्या बाबतीत असेल तर मग मात्र त्याचे काहीही परिणाम होण्याची शक्यता असते. रागाच्या भरात प्रियकर आणि प्रेयसीसुद्धा एकमेकांच्या जीवावर उठू शकतात. अशीच एक घटना पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील केसीया गावात समोर आली आहे. प्रियकर आपल्याला टाळतोय, आपल्यापासून दूर जातोय, असे वाटल्याने प्रेयसीने आधी प्रियकराला चुंबन दिले. त्यानंतर त्‍याच्यावर  गोळी झाडली. सुदैवाने या हल्ल्यातून प्रियकर वाचला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर २२ वर्षांचा तर प्रेयसीसुद्धा २२ वर्षांची आहे. तरुणी झारखंड तर तरुण पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील केसीया गावचा राहणारा आहे. दोघेही चार वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र काही दिवसांपूर्वी ती नोकरीच्या कामानिमित्त पुन्हा झारखंडमध्ये परतली होती. तिथून महिनाभराने ती परतली तेव्हा प्रियकराचे आपल्यावरील प्रेम कमी झाले असे तिला वाटू लागले.

एक दिवस तिने प्रियकराला मिठी मारले. चुंबन घेतले. दोघांनी एकत्र सिगारेटही ओढले आणि प्रियकराला काही कळण्याच्या आतच तिने प्रियकरावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. गोळ्या पोटात घुसल्याने प्रियकर गंभीर जखमी झाला. घटनेनंतर प्रेयसीने पळ काढला. मात्र पोलिसांनी तिला अटक केली असून, तिच्याकडून हल्ल्यात वापरलेली बंदूक सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. दोघांमधील अंतर वाढत असल्याचे वाटत असल्याने तिने प्रियकरावर गोळ्या झाडल्याचे कबूल केले.