धडाक्‍यात पार पडला समलैंगिक विवाह...; ८ वर्षांपासून होते प्रेमात, हैदराबादमध्ये झाला सोहळा!

 
हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पार पडलेल्या एका विवाहाची सध्या देशभर चर्चा होत आहे. आता तुम्‍ही म्‍हणाल असं काय होतं या लग्नात की ज्‍याची चर्चा देशभर झाली... पण हे लग्न मुला-मुलीचे नाही तर चक्क दोन मुलांचे होते. हा समलैंगिक विवाह सोहळा असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

दिल्लीचा अभय डांगे (३४) आणि पश्चिम बंगालचा सुप्रियो चक्रवर्ती (३१) यांचा हा विवाह पार पडला. दोघेही आठ वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमसंबंधात (!) होते. आठ वर्षे सोबत घालवल्यानंतर दोघांनी समलैंगिक विवाह करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात दोन्हीकडील परिवार सहभागी होते. लग्नात हळद समारंभ, मेहंदी समारंभापासून संगीत रजनीपर्यंत सर्वच कार्यक्रम उत्साहात झाले. भारतीय विवाह कायद्यानुसार हा विवाह नोंदणीकृत होऊ शकत नाही.

मात्र अभय आणि सुप्रिया यांनी लग्नानंतर केलेले विधान हे खूप चर्चेत आले आहे. खुश राहण्यासाठी आम्हाला कुणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही, असं या जोडप्याचं म्हणणं आहे. अभय आणि सुप्रियो दोघांची ओळख सोशल मीडिया साइटवर झाली होती. ऑक्टोबरमध्ये दोघांनी लग्नाची घोषणा केली होती. अभय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॅनेजर आहे. तो हैदराबादेत एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करतो, तर सुप्रियाे हा हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काम करतो. बंगाली आणि पंजाबी परंपरांनी हा समलैंगिक विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर अभयने सुप्रियोसाठी "आये हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके' हे गाणेही म्हटले.