कपड्यांच्या वरून प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे बलात्कारच!; मेघालय हायकोर्टाचा निर्णय

 
शिलाँग : महिलेच्या प्रायव्हेट पार्टला कपड्यांवरून हात लावणे किंवा स्पर्श करणे हा बलात्कारच समजला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मेघालय उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना दिला आहे.

२३ सप्टेंबर २००६ रोजी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणी ३० सप्टेंबर २००६ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. वैद्यकीय तपासणीत पीडित मुलीच्या प्रायव्हेट पार्टला इजा झाल्याचे समोर आले होते. डॉक्टरांनी देखील पीडितेवर बलात्कार झाल्याचा अहवाल दिला होता. पीडितेच्या प्रायव्हेट पार्टचा अंतर्गत भाग कोणत्याही शारीरिक हालचालींमुळे नसून अन्य काही भाग तिच्या प्रायव्हेट पार्टवर घासल्यामुळे खराब झाल्याचेही तपासात समोर आले होते.

याआधी स्थानिक सत्र न्यायालयानेही बलात्कार प्रकरणात आरोपींना दोषी ठरवले होते. त्यानंतर आरोपींनी मेघालय उच्च न्यायालयात  सत्र न्यायालयाच्या निर्णयविरोधात दाद मागितली होती. त्यावेळी पीडितेचे कपडे काढलेच नाहीत. मग हा बलात्कार कसा झाला, असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला. मात्र न्यायालयाने आरोपीचा युक्तिवाद फेटाळून लावला.

न्यायालयाने निर्णय देताना म्हटले आहे, की बलात्काराच्या प्रकरणांमध्ये फक्त प्रवेश आवश्यक नाही. कोणत्याही महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जबरदस्तीने पुरुषाचे प्रायव्हेट पार्ट घुसवणे हा प्रकार बलात्काराच्या श्रेणीत येतो. अशा वेळी जर पीडितेने घटनेच्या वेळी अंतर्वस्त्रे घातलेली असतील तरीही त्याला बलात्कारच म्हटले जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. पीडित मुलीने तिच्या जबाब देताना म्हटले होते की, आरोपीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्रवेश केला नव्हता. त्यामुळे तिला वेदनाही झाल्या नव्हत्या. मात्र आरोपीने त्याचा प्रायव्हेट पार्ट तिच्या अंतर्वस्त्रावर घासला होता.