भीषण दुर्घटना! विहिरीत पडून १३ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नौरंगिया येथील एका घरी काल रात्री हळद समारंभाचा कार्यक्रम होता. परंपरेनुसार विहिरीचे पूजन करण्याची प्रथा असल्याने विहिरीचे पूजन करण्यासाठी महिला आणि मुली एकत्रित आल्या होत्या. विहिरीवर असलेल्या लोखंडी जाळीवर अधिक वजन झाल्याने जाळी तुटली आणि जाळीवर उभे असलेले सर्व जण विहिरीत पडले. अंधार असल्याने एकच गोंधळ उडाला. विहिरीत पडलेल्या लहान मुलींना वाचविण्यासाठी काही महिलांनी पुन्हा विहिरीत उड्या घेतल्याने त्यांचाही मृत्यू झाला.
दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पाण्याने भरलेल्या विहिरीतून १३ जणांना बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन रात्रीपासून बचाव कार्य करीत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. संबंधित प्रशासनाला त्यांनी बचाव कार्य आणि जखमींची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय या दुर्घटनेत मृत्यमुखी पडलेल्यांच्या परिवाराला ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.