युपीएससी परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळविलेल्या श्रुती शर्माला मुलाखतीत मिळाले होते कमी मार्क!
तरीही मिळवला १०,९३,९८४ विद्यार्थ्यांमधून पहिला क्रमांक ; कसा ते वाचा...!
श्रुती शर्माला एकूण ५४.५६ टक्के एवढे गुण मिळाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावरील अंकिता अग्रवालला ५१.५८ टक्के एवढे गुण मिळाले आहेत. अंकितापेक्षा श्रुतीला ५५ गुण अधिकचे आहेत, ते तिने मुख्य परीक्षेत मिळवले होते. विशेष म्हणजे. श्रुतीपेक्षा अंकिताला मुलाखतीत चांगले गुण मिळाले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने यंदा ६८५ जणांची निवड केली असून त्यात १७७ महिला आहेत.
युपीएससीने जाहीर केलेल्या ७४९ पदांच्या भरतीसाठी देशभरातून १० लाख ९३ हजार, ९८४ उमेदवारांनी अर्ज केले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या पूर्व परीक्षेत ५ लाख ८ हजार ६१९ जणांनी परीक्षेत भाग घेतला होता. त्यापैकी जानेवारी २०२२ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेत ९ हजार २१४ उमेदवारांनी परीक्षा दिली त्यातून १८२४ जणांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी ६८५ जणांची अंतिम यादी आयोगाने प्रसिद्ध केली.
श्रुती शर्माला मुख्य परीक्षेत ९३२ तर मुलाखतीत १७३ गुण मिळाले. नंबर दोन असलेल्या अंकिता अग्रवाल हिला मुख्य परीक्षेत ८५८ तर मुलाखतीत १७९ गुण मिळाले. तिसऱ्या क्रमांकावरील गामिनी सिंगला हिला मुख्य परीक्षेत ८५८ तर मुलाखतीत १८७ गुण मिळाले होते. चौथ्या क्रमांकावरील ऐश्वर्य शर्मा याला मुख्य परीक्षेत ८६० तर मुलाखतीत १६५ गुण मिळाले तर पाचव्या क्रमांकावरील उत्कर्ष द्विवेदी याला मुख्य परीक्षेत ८७१ व मुलाखतीत १६५ इतके गुण मिळाले आहेत.