​​​​​​​नोकरीच्या आमिषाने घरी, हाॅटेलमध्ये नेऊन वारंवार युवतीवर लैंगिक अत्याचार!; तरीही नोकरी न मिळाल्याने तिने गाठले पोलीस ठाणे!!

 
ग्वाल्हेर : नोकरीचे आमिष दाखवून लोकायुक्त कार्यालयात कार्यरत लोकायुक्त उपनिरीक्षकाने ३२ वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून लोकायुक्त उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र सिंह यादव असे आरोपीचे नाव आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर  तो लोकायुक्त कार्यालयात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाला होता. ग्वाल्हेरच्या नाका चंद्रबनी परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय युवतीला त्याने नोकरीचे आमिष दाखविले.

सुरुवातीला सुरेंद्रने सतत तीन महिने तिचा विनयभंग केला. नंतर तिला स्वतःच्या घरी नेऊन तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. शहरातील एका हॉटेलमध्ये नेऊन सुद्धा तिच्यावर बलात्कार केला. तिची हतबलता पाहून त्याची हिंमत आणखी वाढली. वारंवार त्याचा हा उद्योग सुरू होता.

लैंगिक शोषण होऊनही नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सुरेंद्र सिंह विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सध्या तो फरारी आहे.