गुगल गर्ल तिसरीतून थेट आठवीत!; हायकोर्टाचा निर्णय, एवढीशी असूनही अचाट बुद्धिमत्ता

 
सार (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशच्या पालमपूर शहरातील तिसरीची विद्यार्थिनी असलेल्या काशवीला आठवीच्या वर्गात बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. काशवीचे वडील संतोष कुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हिमाचल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहम्मद रफिक आणि न्यायमूर्ती ज्योत्‍स्‍ना रेवाल-दुआ यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. काशवीला अचाट बुद्धिमत्तेची देणगी लाभली असून, तिचे ते ज्ञान लक्षात घेऊन उच्‍च न्‍यायालयाने तिला थेट आठवीची परीक्षा देऊ द्यायचा निर्णय दिला.

न्यायालयाने आदेश दिला, की जर काशवीने आठवीच्या वर्गात विद्यार्थिनी म्हणून शाळेत (तात्पुरता) प्रवेश घेतला तर तिच्या एकूण प्रगतीवर संबंधित शाळा अधिकाऱ्यांकडून नियमितपणे लक्ष ठेवले जाईल. काशवीच्या शालेय प्रगतीचा अहवाल देखील संबंधित शाळेने कोर्टात दाखल करावा, अशी सूचना देण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ एप्रिलला होणार आहे.

काशवीचा जन्म १२ मार्च २०१४ चा आहे. सध्या ती रेनबो पब्लिक सीनियर सेकंडरी स्कूल, पालमपूर येथे तिसऱ्या वर्गात शिकत आहे. ती एक विलक्षण आणि बौद्धिकदृष्ट्या अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे. तिला गुगल गर्ल म्हणूनही ओळखले जाते. काशवीचे सामान्य ज्ञान आणि इतर विषयांचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत.

काशवीच्या वडिलांनी १६ ऑक्टोबर २०२१ रोजी झोनल हॉस्पिटल धर्मशाला येथे तिची आयक्यू चाचणी केली. यात तिचा बुद्ध्यांक १५४ इतका होता. ती विलक्षण, बौद्धिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे, असे तिची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते. काशवीच्या आयक्यू चाचणीच्या निकालासह तिच्या वडिलांनी राज्य शिक्षण विभाग, हिमाचल प्रदेशच्या विविध अधिकाऱ्यांना पत्रे पाठवून तिला आठव्या वर्गात प्रवेश देण्याची आणि आठवीच्या परीक्षेला बसू देण्याची विनंती केली. मात्र तिला तशी परवानगी न मिळाल्याने त्यांनी थेट न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने संपूर्ण रेकॉर्ड तपासल्यानंतर तिला आठव्या वर्गात बसण्याची परवानगी दिली आहे.