व्हॉटस् ग्रुप ॲडमिनसाठी दिलासादायक बातमी...  ग्रुपमध्ये पडलेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी ॲडमिन जबाबदार नाही, उच्च न्यायालयाचा निकाल

 
त्रिवेंद्रम ः व्हॉटस् ॲप ग्रुपमध्ये दुसऱ्या एखाद्या सदस्याने टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी ग्रुप ॲडमीनला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाचा हा निर्णय व्हॉटस् ग्रुप ॲडमिनसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय ठरला आहे. एका प्रकरणावर सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. हे वृत्त भास्कर या हिंदी वृत्त संकेतस्‍थळाने दिले आहे.

मार्च २०२० मध्ये केरळमधील फ्रेंड नावाच्या एका व्हॉटस् ॲप ग्रुपवर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्या व्हिडिओत अल्पवयीन मुलांना आक्षेपार्ह अवस्थेत दाखविण्यात आले होते. पोलिसांनी व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या सोबतच त्या ग्रुपचा ॲडमिन असलेल्या व्यक्तीविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ग्रुप ॲडमिनने न्यायालयात धाव घेतली होती.

ॲडमीनजवळ केवळ ग्रुपमध्ये कुणाला ॲड करायचे आणि कुणाला काढून टाकायचे एवढेच अधिकार असतात. ग्रुपमध्ये कोणी काय पोस्ट करावी याचे कोणतेही नियंत्रण ग्रुप ॲडमीनकडे नसते. त्यामुळे ग्रुपमध्ये टाकलेल्या पोस्टला ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले व ग्रुप ॲडमीनची निर्दोष सुटका केली. मात्र ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा दोषी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.