इंधनदरवाढीचा भडका!; नऊ दिवसांत पेट्रोल, डिझेलचे आठव्यांदा वाढले भाव!!; जाणून घ्या आज कुठे किती दर

 
नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे.  कच्चा तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने ही इंधन दरवाढ सुरू आहे. आज, ३० मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा ८० पैशांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या नऊ दिवसांतील ही आठव्यांदा झालेली दरवाढ आहे. देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे भाव १०१.०१ रुपये प्रतीलिटर तर डिझेल ९२.२७ रुपये प्रतिलिटर या भावाने मिळत आहे.

इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. इंधनाचे दर वाढले की किराणा सामानापासून तर सर्वच आवश्यक वस्तूंचे भाव वाढतात. देशात जवळपास सर्वच ठिकाणी पेट्रोल शंभरीपार पोहोचले आहे. याआधी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका असल्याने केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात केल्या जाणाऱ्या दैनंदिन सुधारणा स्थगित केल्या होत्या.

मात्र त्यानंतर पुन्हा भाववाढ सुरू केली आहे. विशेष म्हणजे इंधन दरवाढीच्या माध्यमातून केंद्र सरकारने एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२१ या नऊ महिन्यांच्या कालावधीत पेट्रोल, डिझेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीतून तब्बल ३.३१ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

आज, ३० मार्च रोजी मुंबईत पेट्रोल ११५.८८ रुपये प्रतिलिटर, डिझेल ९२.२७ रुपये प्रतिलिटर, चेन्नईत पेट्रोल १०६. ६९ रुपये तर डिझेल ९६.७६ रुपये, कोलकाता येथे पेट्रोल ११०.५२ रुपये तर डिझेल ९५.४२ रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे.