फेसबुकने बना दी जोडी... अमेरिकेची ग्रेलिन बनली पंजाबची सून! पठाणकोटच्या नीरजची झाली बायको!

 
पठाणकोट : रब ने बना दी जोडी हा चित्रपट तुम्ही बघितला असेल... आम्ही जी लव्हस्टोरी तुम्हाला सांगणार आहोत ती वाचल्यावर तुम्ही फेसबुकने बना दी जोडी.. असे म्हटल्याशिवाय राहणार नाही. ही कहाणी आहे पंजाब राज्यातील पठाणकोटच्या नीरज आणि अमेरिकेतील सेंट्रल कोस्टारिका येथील ग्रेलिनची. साता समुद्रापार असलेल्या अमेरिकेतील ग्रेलिन आणि निरजची ओळख ४ वर्षांपूर्वी फेसबुकवर झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि लग्नात होईल, असा विचारही त्यांनी केला नव्हता. मात्र तसं प्रत्यक्षात घडलंय. दोघेही नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.

नीरज सांगतो की, कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी दोघे फक्त चांगले मित्र होते. लॉकडाऊननंतर दोघांनी फेसबुकवर चॅटिंग सुरू केले. चॅटिंगसोबतच दोघेही फोन कॉलवर बोलू लागले. त्यानंतर अचानक दोघांची जवळीक वाढली आणि दोघांनीही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले. फेसबुकवरील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी उत्सुक होते.

मात्र आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्यामुळे दोघांची केवळ आभासी भेट होत होती. दोघांमध्ये सात समुद्राचे अंतर होते. कोविडची प्रकरणे कमी झाली आणि पुन्हा परिस्थिती सामान्य झाली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्यावर ग्रेलिनने भारतात येण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या कुटुंबियांना भारतात जाण्यासाठी राजी केल्यानंतर ग्रेलिन विमानाने पठाणकोटला पोहोचली. नीरजने फेसबुकवर ग्रेलिनच्या मैत्रीची आणि प्रेमाची माहिती त्याच्या कुटुंबियांनाही दिली होती.

घरच्यांनीही लग्नाला होकार दिला. बुधवारी ग्रेलिन आणि नीरज यांचे शीख रितीरिवाजांनुसार लग्न झाले. त्यांच्या लग्नाचे विधी मिशन रोड गुरुद्वारा साहिब येथे पार पडले. कोविडपूर्वी नीरज एका खासगी कंपनीत मार्केटिंग मॅनेजर होता. लॉकडाऊननंतर त्याने खासगी कंपनीची नोकरी सोडली आणि त्याचे वडील आणि भाऊ करत असलेले फर्निचर आणि इंटिरियर डिझायनिंगचे काम हाती घेतले. आता तो केवळ कौटुंबिक व्यवसाय करत आहे. नीरज अजून ग्रेलिनच्या कुटुंबाला नीट ओळखत सुद्धा नसल्याचे त्याने सांगितले.

अमेरिकेत असलेल्या ग्रेलिनच्या कुटुंबात तिची आई, वडील आणि बहीण आहेत. मात्र नीरजला सध्या त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. ग्रेलिनचे वडील वाहतूक व्यवसाय करतात. ग्रेलिनने आता पंजाबमध्ये राहून पंजाबी संस्कृती शिकावी, अशी नीरज व त्याच्या परिवाराची इच्छा  आहे. ग्रेलिननेही यासाठी सहमती दर्शवली आहे.  काही दिवसांनी ती अमेरिकेला जाणार आहे. तिथून परतल्यानंतर ती पठाणकोटला राहणार आहे. नीरज सांगतो, की ग्रेलिनला फक्त स्पॅनिश येतं. जेव्हा ते फेसबुकवर मित्र बनले, तेव्हा दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती. परंतु गुगल ट्रान्सलेटरने त्यांच्यातील भाषेची भिंत तोडली. आता केवळ इशाऱ्यांनी दोघे एकमेकांचे म्हणणे समजून घेतात.