आ. सौ. श्वेताताई महाले पाटील ठरल्या देशात सर्वोत्‍कृष्ठ आमदार!; सिक्स सिग्मा एक्सलन्स अवाॅर्डने झाल्या सन्मानित!!

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विरोधी पक्षात असूनही केलेली विकासकामे आणि प्रचंड जनसंपर्क व लोकप्रियतेच्या बळावर चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील देशात सर्वोत्‍कृष्ठ आमदार समोर आल्या आहेत. त्‍यांना नुकतेच नवी दिल्लीत भारताचे पहिले माजी सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या स्मरणार्थ सिक्स सिग्मा एक्सलन्स अवाॅर्डने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते काल, १६ मार्चला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. काटेकोर नामांकन प्रक्रिया, अंतर्गत व बाह्य अंकेक्षण, सखोल विश्लेषणाद्वारे सर्वोच्च ज्युरी मंडळाने माझ्या कार्यकर्तृत्वाचे मूल्यांकन करून हा पुरस्कार जाहीर केला होता. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आपला ध्यास कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्‌गार सिक्स सिग्मा एक्सलन्स अवाॅर्डस्‌ अँड लीडरशिप समिटचे आयोजक अध्यक्ष डाॅ. प्रदीप भारद्वाज यांनी आ. सौ. महाले पाटील यांच्याबद्दल काढले.

विनम्रतेने माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने या सन्मानाचा स्वीकार केला, अशी प्रतिक्रिया आ. सौ. महाले पाटील यांनी बुलडाणा लाइव्हला दिली. जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या अडीअडचणीत सुख दुःखात सहभागी होता आले, येत आहे हे माझे भाग्य आहे. त्‍यामुळे हा सन्मान माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा असून हा पुरस्कार मी जनतेलाच अर्पण करते, असेही त्‍या म्‍हणाले.

खासदार जाधवही सन्मानित
दरम्‍यान, केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनाही सिक्स सिग्मा एक्सलन्स अवाॅर्डस्‌ने यावेळी सन्मानित करण्यात आले.