सावत्र मुलगा म्हणाला, तू आज वाचलास, दुसऱ्या वेळेस पाहून घेतो..!; चिखलीच्या व्यक्तीने गाठले पोलीस ठाणे!!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सावत्र मुलाने 45 वर्षीय व्यक्तीस शिविगाळ करून मारहाण केली. पत्नीन व मोठ्या भावाने हे भांडण सोडवले. मात्र यांच्यामुळे तू आज वाचला, दुसऱ्या वेळेस पाहून घेतो, अशी धमकी सावत्र मुलाने दिली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी या सावत्र मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तस्लीम खान करीम खान (45, रा. वॉर्ड क्र. 9, अंगुरचा मळा चिखली) हे मिस्तरी काम करतात. ते पत्नी व सावत्र मुलासह राहतात. सावत्र मुलगा शेख अनिस शेख हसन नेहमी त्यांच्याशी भांडण करत असतो. 21 मे रोजी रात्री नऊच्या सुमारास तस्लीम खान घरी आले असता पत्नी साजेता बी यांनी जेवण करून घेण्यास सांगितले. त्यावेळी सावत्र मुलगा शेख अनिस हा साजेता बी यांना म्हणाला, की त्याला जेवण करायला कशाला सांगत असते. त्यामुळे तस्लीम खान आणि शेख अनिस यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर भांडणात होऊन शिविगाळ करत शेख अनिसने हातातील स्टीलचा ग्लास त्यांच्या कपाळावर हाणला. साजेता बी व तस्लील यांचा मोठा भाऊ सलीम खान यांनी दोघांना समजावून आवरले. यावेळी तू आज यांच्यामुळे वाचला. दुसऱ्या वेळेस तुला पाहूनच घेतो, अशी धमकी शेख अनिसने दिली. त्यामुळे तस्लीम खान यांनी चिखली पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.