"बाबा मला जगण्यापेक्षा मरण पत्कराव वाटतं आहे, तुम्ही भाऊबीजेची साडी माझ्या सरणावर आणा..!" रडत रडत तिने फोन ठेवला अन् टोकाचा निर्णय घेतला! नवऱ्याने आदल्या रात्री "त्या" कारणासाठी दिले होते चटके!

 मलकापूर तालुक्यातील धक्कादायक घटना

 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दिवाळीच्या सणाला मलकापूर तालुक्यातील खामखेड गावात अघटीत घडलं. २२ वर्षीय विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.मेघा गणेश मुंडे(२२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मेघाचा यंदाचा लग्नानंतरचा पहिलाच दिवाळीचा सण होता, लग्न होऊन अवघे ८ महिने झाले होते. मात्र तिच्या नवऱ्यासह सासरच्या लोकांनी तिला एवढे छळले की तिला टोकाचा निर्णय घ्यावा लागला. आदल्या रात्री तिने वडिलांना फोन केला, "नवरा माहेरवरून पैसे आणण्यासाठी किती छळतोय, मारहाण करतोय..चटके देतोय..आता जगणे मुश्किल झालेय..तुम्ही त्यांना पैसे आणून द्या नाहीतर भाऊबीजेची साडी माझ्या सरणावर आणा" असे म्हणत रडत रडत तिने फोन ठेवला अन् दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या मृत्यूची खबर मिळाली..मेघाच्या वडिलांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली आहे. तक्रारीवरून तिच्या पतीसह सासू, सासरे व घरातील इतर अशा एकूण ८ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारनुसार यावर्षी मार्च महिन्याच्या ९ तारखेला मेघाचे लग्न खामखेडच्या गणेश मुंडे याच्याशी झाले. मेघाचे माहेर खामगाव तालुक्यातील हिवरा खुर्द होते.लग्नात मेघाच्या वडिलांनी हुंडा म्हणून सोन्याचा गोफ, अंगठी असे एक लाख रुपयांचे सोने व एक लाख रुपये कॅश दिले व १ लाख रुपये नंतर द्यायचे ठरले होते.

  लग्नानंतर सासरच्या लोकांनी आधीचे दोन तीन महिने चांगले वागवले. मात्र त्यानंतर सासू, जाऊ, नणंद या विविध कारणांवरून टोमणे मारायच्या. तुला स्वयंपाक येत नाही, तू दिसायला चांगली नाही, शेतातील काम येत नाही या कारणावरून तिला शिवीगाळ व्हायची. नवरा तुझ्या बापाकडून एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणत मारहाण करायचा. मेघाला उपाशी ठेवण्यात येत होते. मेघा रडत रडत या गोष्टी फोनवरून आईवडिलांना सांगायची..त्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी तिचे फोनवर बोलणे देखील बंद केले. बोलायचेच असेल तर फोन स्पीकर वर ठेव आणि जवळ बसून बोल असा दम तिला दिल्या जात होता असे तक्रारीत म्हटले आहे.

रक्षाबंधन सणाच्या १५ दिवस आधी मेघाने कसातरी चोरून लपून तिच्या वडिलांना फोन केला. "माझ्या सासरच्या लोकांचा त्रास मला सहन होत नाही, हे लोक मला मारून टाकतील, तुम्ही मला न्यायला या" असे ती म्हणाली.यावरून मेघाचे वडील काही वेळात खामखेड येथे पोहचले. त्यावेळी तुम्ही फक्त दिवाळी पर्यंत थांबा तुम्हाला २ लाख रुपये देतो असे मेघाचे वडील तिच्या सासरच्या लोकांना म्हणाले..यावर "भिकाऱ्या हलकटा हुंडा द्यायची ऐपत नव्हती तर लग्न कशाला करून दिले" असे सासरचे लोक म्हणाले.तर "२ लाख रुपये आणा तरच मी मेघाला घरात घेईल" असे तिचा नवरा गणेश म्हणाला व मेघा आणि मेघाच्या वडिलांना हाकलून दिले.


या घटनेनंतर ७ - ८ दिवसांनी मेघाच्या नवऱ्याने मेघाच्या वडिलांना फोन केला . तुम्ही मेघाला आणून घ्या, तिला त्रास देणार नाही..हुंडा मागणार नाही असे तो म्हणाला. त्यामुळे मेघाच्या वडिलांनी मेघाला सासरी नेऊन सोडले. त्यानंतर एक महिना मेघाला चांगले वागवले मात्र त्यानंतर आधिसारखाच तिचा छळ सुरू झाला. तिला माहेरच्या लोकांशी फोनवर बोलू दिल्या जात नव्हते, एवढेच नव्हे तर मेघाचे वडील आणि तिचा भाऊ तिला भेटायला गेला तेव्हा भेटुही दिले नाही.

अन् तो फोन आला...

लक्ष्मीपूजनाच्या आदल्या रात्री मेघाचा तिच्या वडिलांना फोन आला.  ती फोनवर रडत होती, "नवरा मारहाण करत आहे, घर बांधकाम करण्यासाठी दोन लाख रुपये आण नाहीतर तुला चटके देतो..तुझ्या जीवाचे बरे वाईट करतो" अश्या धमक्या देत असल्याचे तिने वडिलांना सांगितले. "तुम्ही त्यांना पैसे देऊन टाका, मला जगण्यापेक्षा मरण पत्करावे वाटत आहे, तुम्ही भाऊबीजेची साडी माझ्या सरणावर टाकायला आणा" असे म्हणत मेघा रडू लागली..यावर थोडा धीर धर, सर्व ठीक होईल अशी समजूत तिच्या वडिलांनी काढण्याचा प्रयत्न केला मात्र मेघाने फोन ठेवून दिला..


दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी ५ वाजता मेघाच्या वडिलांचा फोन वाजला, मलकापूर येथील महादेव मुंडे यांनी फोन करून मेघाची तब्येत जास्त आहे, तिला उपचारासाठी मलकापूर येथील काबरा हॉस्पिटल मध्ये आणले असल्याचे सांगितले. तातडीने मेघाचे वडील नातेवाइकांसह मलकापूर येथे पोहचले, हॉस्पिटल मध्ये मुलगी मेघा मरण पावल्याचे पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. मेघाच्या पायावर चटके दिल्याचे व्रण दिसून आले. मेघाच्या वडिलांनी तिच्या सासऱ्याला व पतीला विचारपूस केली असता ते काहीही न सांगता दवाखान्यातून निघून गेले. दवाखान्यात विचारपूस केली असता मेघाने विषारी औषध प्राशन केल्याने तिच्या वडिलांना समजले. त्यानंतर मेघाच्या वडिलांनी मलकापूर  ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून मेघाचा नवरा गणेश मुंडे, सासरा शालीग्राम मुंडे, सासू कमलाबाई, जाऊ सुनंदा प्रकाश मुंडे, दिर अनिल शंकर मुंडे, चुलत दिर सापूर्दा मनोहर मुंडे,  जाऊ रेखा मुंडे, नणंद ललिता मुंडे अशा ८ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल केला आहे.