दोन तरुणींसह तीन महिला जिल्ह्यातून बेपत्ता; बुलडाणा, मेहकर, नांदुऱ्यातील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून आज, १५ जूनला ५ महिला-तरुणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत. या घटना बुलडाणा, मेहकर, नांदुरा या शहरांतील आहेत.
बुलडाणा शहरातून दोन महिला बेपत्ता झाल्या आहेत. सुवर्णनगर येथील श्रीराम तुकाराम पिसे यांनी तक्रार दिली, की ते आज सकाळी १० वाजता कामाला गेले होते. दुपारी २ ला परत आले असता त्यांना पत्नी जया (२६) घरात दिसली नाही. त्यांनी सगळीकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. उंची पाच फूट, रंग निमगोरा, अंगात निळसर पंजाबी ड्रेस, पायात लाल चप्पल असे तिचे वर्णन आहे. शहरातीलच दुसऱ्या घटनेत आंबेडकरनगर येथील वसंता आनंदराव जाधव (४८) यांनी तक्रार दिली की, त्यांची पत्नी आशा (४४) ही काल, १४ जून रोजी घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली. रंग निमगोरा, हिरवी साडी, हिरवट ब्लाऊज, अंगावर दागिने, पायात सँडल असे तिचे वर्णन आहे. दोन्ही घटनांचा तपास एएसआय श्री. कानडजे करत आहेत.
नांदुरा शहरातील पेठकर गल्लीतील रहिवासी श्रुती रमेश पेठकर (१९), मेहकर शहरातील सहकार कॉलनीतील सौ. उषा अविनाश मोरे (२७), मेहकर शहरातीलच सासवानंदनगरातील अंतरा अजय पागोरे (१९) या तिघी घरात कुणाला काही न सांगता निघून गेल्या असून, त्यांच्या हरवल्याच्या तक्रारी अनुक्रमे नांदुरा, मेहकर पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत.