दुचाकीचोरीच्‍या घटनांचे सूत्रधार अखेर गजाआड!; ११ मोटारसायकली जप्‍त, LCB ची धडाकेबाज कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जिल्ह्यात दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ होत होती. या चोरट्यांचा छडा लावण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलासमोर होते. त्यासाठीच कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी एका विशेष पथकाला हे जिकरीचे काम सोपविले होते. त्या पथकाने “एसपीं’नी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत आज, ३ सप्टेंबर रोजी दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ११ …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जिल्ह्यात दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ होत होती. या चोरट्यांचा छडा लावण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलासमोर होते. त्यासाठीच कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी एका विशेष पथकाला हे जिकरीचे काम सोपविले होते. त्या पथकाने “एसपीं’नी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत आज, ३ सप्टेंबर रोजी दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ११ मोटारसायकली, गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या आणखी दोन मोटारसायकली, २ मोबाइल असा एकूण ५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संतोष गोविंद वानखेडे (२८, रा. पिंप्री कोरडे, ता. खामगाव) व आकाश भगवान खरात (३०, रा. हिवरा खुर्द ता. मेहकर) अशी चोरट्यांची नावे आहेत. आज संतोषला उंद्री येथून “एलसीबी’च्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याजवळच्या दुचाकीबद्दल विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस केल्यावर हिवरा खुर्द येथील आकाशच्या मदतीने त्याने अमडापूर, जानेफळ, मेहकर तसेच अकोला जिल्ह्यातून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार एलसीबी पथकाने हिवरा खुर्द येथून आकाशला सुद्धा ताब्यात घेतले. आकाशनेही त्याचा साथीदार संतोषच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

दोघांकडून त्यांनी चोरलेल्या ११ दुचाक्या जप्त करण्यात आल्‍या. दोघांविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील तपासासाठी अमडापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने “एलसीबी’चे सहायक पोलीस निरिक्षक अमित वानखेडे, सहायक पोलीस निरिक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ पंकजकुमार मेहेर, दिनेश बकाले, पुरुषोत्तम आघाव, गजानन गोरले, रवी भिसे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.