तुमचे कबूतर माझ्या घराच्या टिनावर का बसले… तरुणाची महिलेला मारहाण, गवंढाळा येथील घटना
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुमचे कबूतर माझ्या घराच्या टिनावर का बसले, असा जाब विचारून तरुणाने महिलेला शिविगाळ करून मारहाण केली. ही घटना 25 जूनला सकाळी 11 च्या सुमारास गवंढाळा (ता. खामगाव) येथे घडली.
सौ. आशा परशराम गायकी (30) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. हरी विठोबा इंगळे याने त्यांना तुमचे कबूतर माझ्या घराच्या टीनावर का बसले, असे विचारले. त्यानंतर आशा गायकी यांना शिविगाळ करून काठी मारून जीवे मारण्याची धमकी दिली. सौ. आशा गायकी व सौ. यमुनाबाई विठोबा इंगळे या दोघींत झटापट झाल्याने आशा यांच्या गळ्यातील पोत तुटून नालीत पडली. यात 8 हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी हरी विठोबा इंगळे व सौ. यमुनाबाई विठोबा इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.