तालखेड शिवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; बोराखेडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद..का घेतला टोकाचा निर्णय? बोरखेडी पोलिसांसमोर तपासाचे आव्हान...
May 12, 2026, 11:33 IST
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):तालुक्यातील तालखेड शिवारात ३४ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बोराखेडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गणेश सपकाळ (वय ३४, रा. तालखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विजय हरी सपकाळ यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास विजय सपकाळ यांना दूरध्वनीवरून माहिती मिळाली की, गणेश सपकाळ यांनी गावशिवारातील चंपालाल कलाळ यांच्या शेतातील गोंधनच्या झाडाला गळफास घेतला आहे. माहिती मिळताच विजय सपकाळ यांनी गावातील काही नागरिकांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे गणेश सपकाळ हे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, गणेश सपकाळ यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक अथवा अन्य कोणत्या कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले का, याचा तपास बोराखेडी पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.