चोरटे शेतकऱ्यांच्या जीवावर उठले! पैनगंगेच्या काठावरील १४ मोटार पंप फोडले; तांब्याच्या तारा चोरल्या.. मेहकर तालुक्यातील भालेगाव शिवारातील प्रकार! खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर मोठे संकट
प्राप्त माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी नदीकाठावरील शेतांमध्ये प्रवेश करून सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत मोटार पंपाचे नुकसान केले. पंप फोडून त्यामधील तांब्याच्या तारा आणि मौल्यवान साहित्य चोरी करून लंपास केले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतकरी शेतात गेले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
खरीप हंगामाच्या तोंडावर घडत असलेले या घटनांमुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. सिंचनासाठी अत्यावश्यक असलेले उपकरणे निकामी झाल्याने पेरणी आधीच्या तयारीवर देखील परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच वाढत असलेला उत्पादन खर्च, बदलते हवामान.. आर्थिक अडचणींचा सामना अशातच पेरणीच्या आधीच अशा पद्धतीचे संकट ओढवल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. या प्रकरणातील आरोपींच्या तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून समोर येत आहे.