घरासमोरील पाण्याच्या टाक्यात पडून 81 वर्षीय आजोबांचा मृत्यू; डोळ्याने कमी दिसत होते; बुलडाणा शहरातील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोरील पाण्याच्या टाक्यात पडून 81 वर्षीय आजोबांचा मृत्यू झाला. ही घटना आज, 27 जून रोजी दुपारी बुलडाणा शहरातील जिजाऊनगरात घडली. यशवंत सोनाजी जाधव (रा. जिजाऊनगर, बुलडाणा) असे या आजोबाचे नाव आहे.
आज दुपारी 1 वाजता यशवंत जाधव यांची पत्नी गुंता जाधव (79) या बुलडाणा शहरातच शारदा कॉलेज परिसरात राहणाऱ्या त्यांच्या मुलीकडे भेटायला गेल्या होत्या. त्यावेळी यशवंत जाधव घरी एकटेच होते. त्यांना डोळ्यांनी कमी दिसत होते. दुपारी 4 वाजता त्यांची पत्नी घरी आली तेव्हा त्यांना घरासमोरील पाण्याचे टाके उघडे दिसले. त्यांनी डोकावून बघितले असता त्यांना यशवंत जाधव यांचा तरंगता मृतदेह दिसला. त्यांनी एकच टाहो फोडला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सुधाकर गवारगुरु यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.