नळगंगा धरणाच्या पात्रात तरुणाचा बुडून मृत्यू; सांगळद शिवारातील घटना
बोराखेडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजण्यापूर्वी नळगंगा धरणाच्या पात्रातील पाण्यावर एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना कृष्णा चव्हाण यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती पिंप्री गवळी येथील अजय हरीभाऊ खराटे यांना दिली.माहिती मिळताच अजय खराटे यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असता, तो अजय खराटे यांचे काका हर्षपाल उर्फ छोटू आनंदा खराटे यांचा असल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सिताराम मेहेत्रे, पीएसआय राजेंद्र कपले, पोहेकॉ. अमोल खराडे, पोलीस अंमलदार प्रमोद साळोख आणि मनोहर पंडित यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.या घटनेप्रकरणी अजय हरीभाऊ खराटे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) करण्यात आली आहे. तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.