जनुना शिवारात युवकाचा मृत्यू;घात कि अपघात परिसरात चर्चा...
Jan 17, 2026, 20:53 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जनुना–जयपूर रोडवरील जनुना शिवारात अनिल जैस्वाल यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यात एका युवकाचा १७ जानेवारी रोजी मृतदेह आढळला. या प्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. फारुख शहा सलीम शहा (वय ३०, रा. अकोला, ह.मु. कोथळी, ता. मोताळा) असे मृतकाचे नाव आहे. दरम्यान, या युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र युवकाचा घात झाला कि अपघात याविषयी चर्चा सुरू आहे.
या घटनेची खबर नरेश सुरेश मानकर (वय ५०, व्यवसाय शेती, रा. जनुना, ता. मोताळा) यांनी पोलिसांना दिली. ते जनुना गावचे पोलीस पाटील असून, गावकऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान नाल्यात एक इसम दुचाकीसह पडलेला व मृत अवस्थेत आढळून आला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दुचाकीवरून जात असताना तोल जाऊन इसम नाल्यात पडला. नाल्यातील मोठ्या दगडावर डोके आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी एच.एफ. डिलक्स कंपनीची दुचाकी (क्र. MH-30 BU 7246) आढळून आली. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार या प्रकरणी अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार श्रीकांत चिटवार करीत आहेत.