मधात गुंगीचे औषध टाकून तरुणीवर लैंगिक अत्याचार!
Updated: Dec 8, 2021, 14:54 IST
औरंगाबाद (लाइव्ह औरंगाबाद वृत्तसेवा) ः सतत डोकेदुखीचा त्रास असल्याने विवाहित तरुणी हकिमाकडे जाऊन उपचार घेत होती. वासनांध हकीम मधात गुंगीचे औषध औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. ही बाब विवाहितेच्या लक्षात आल्यानंतर तिने जाब विचारला असता त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर वर्षभर तो तिचा उपभोग घेत राहिला. मात्र त्यानंतरही तो लग्नास टाळाटाळ करू लागल्याने विवाहितेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी हकीम शेख मुश्ताक उर्फ मुश्ताक कव्वाल (४०, मालेगाव मालदा शिवार, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, डोके दुखत असल्याने उपचारासाठी ती मुश्ताककडे जात होती. तो औषध म्हणून देत असलेल्या मधात गुंगीचे औषध टाकत होता. तिला गुंगी आल्यानंतर तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. महिलेला हे कळल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले व पुन्हा वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. औरंगाबाद शहरातील आरेफ कॉलनी भागात मुश्ताकची बहीण राहते. तिच्या घरात हा सर्व प्रकार सुरू होता. रहेमानिया कॉलनी, कोहिनूर कॉलनी इथेही त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. मात्र वर्षभरानंतर विवाहास टाळाटाळ करून विवाहितेच्या मुलाला व भावाला जीवे मारून टाकण्याची धमकी मुश्ताकने महिलेला दिली. अखेर तिने काल, ७ डिसेंबर रोजी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुश्ताकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.