जळगाव जामोद तालुक्यात सापडलेले मुंडके आणि अर्धवट जळलेले धड महिलेचे! आधी खून केला नंतर जाळला मृतदेह! ओळख पटेना; पायात गुलाबी सॅंडल, हातात हिरव्या बांगड्या अन् काळा दोरा...

 तुमच्या परिचयातील बेपत्ता महिला असेल तर पोलिसांशी साधा संपर्क..

 
 जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात काल एक धडावेगळे झालेले मुंडके सापडले होते. त्यानंतर केलेल्या शोधाअंती धड देखील सापडले होते. ते धड महिलेचे असल्याचे समोर आले असून हा खूनच आहे या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. मात्र खून झालेल्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

 संबंधित घटनास्थळ जंगल परिसरा जवळ असल्याने आधी "वन्य प्राण्याचा हल्ला" अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र धड सापडल्यानंतर आता हा खूनच असल्याचे दिसत आहे. मारेकऱ्यांनी आधी खून करून नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे. धड अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे. मात्र ही महिला कोण? तिला कुणी आणि कोणत्या कारणासाठी मारले याबाबत महिलेची ओळख पटल्यानंतरच समोर येणार आहे. ओळख पटवण्यासाठी पोलिसांच्या वतीने शोध पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. 

पोलिसांनी प्रसिद्धी दिलेल्या शोध पत्रिकेनुसार खून झालेल्या महिलेचे अंदाजे वय २० ते ३० वर्ष दरम्यान असून उंची ५ फूट ३ इंच इतकी आहे. सावळा वर्ण, काळे केस, निळ्या रंगाची ब्रा, गुलाबी रंगाची सॅंडल, उजव्या हातात काळया रंगाचा धागा, गळ्यात काळ्या मण्याची पोथ अशा वर्णनाची महिला आहे. या वर्णनाशी मिळती जुळती बेपत्ता महिला माहिती असल्यास पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर ९९२३४८१९४७, यशोदा कणसे ८६६८७३८३८४ या क्रमांकावर संपर्क साधावा.