देऊळगाव राजा तालुक्यात महिलेचा विनयभंगाचा प्रयत्न; विरोध करणाऱ्यावर दगडाने हल्ला...

 
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील एका गावात महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराला विरोध करणाऱ्या व्यक्तीवर दगडाने हल्ला करून त्याला जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, १४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्या घरी असताना आरोपी अभिजीत अनिल सरकटे तेथे आला. त्याने वाईट उद्देशाने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड सुरू केली.

महिलेचा आवाज ऐकून एक व्यक्ती घटनास्थळी धावत आला आणि त्याने आरोपीच्या कृत्याला विरोध केला. यामुळे आरोपीने त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर घटनास्थळी पडलेला दगड उचलून आरोपीने त्या व्यक्तीच्या पायावर मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर महिलेने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या आदेशाने पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.