दहा लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ; मुलगी जन्मल्यावर पतीकडून अमानुष वागणूक! कोथळीच्या लेकीला वडनेर भोळजीत नरकयातना... 

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, मुलगी जन्मास येताच विवाहितेचा छळ करण्यात आला. तिच्या रूपावरून टिंगलटवाळी करत दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमैय्या अब्दुल जमशिद या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे लग्न वडनेर भोलजी येथील अब्दुल जमशिद अब्दुल हमीद याच्याशी मुस्लिम समाजाच्या रीतिरिवाजानुसार झाले होते. सुरुवातीला काही काळ चांगले संबंध असतानाच मुलगी जन्मल्यावर तिच्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार सुरू झाले. "तू दिसायला चांगली नाहीस", "तुला स्वयंपाक येत नाही", अशा स्वरूपाचे अपमानकारक वक्तव्य करत पती व इतर नातलगांनी तिला त्रास दिला.
यात सासू अ. हमीद, नणंद शमा, नसीमा, शमीना, जेठ अ. मुश्ताक व अ. वहिद यांचा सहभाग असून, ते पतीला भडकवत असल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. पतीने व्यवसाय व घराच्या बांधकामासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करत मारहाण केली, तसेच पैसे न आणल्यास माहेरीच राहण्याचा निर्वाणीचा इशारा दिला.
या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून ८ जून रोजी बोराखेडी पोलिसांनी सात जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.