मध्यरात्री अंगणात झोपलेल्या महिलेची सोन्याची नथ लंपास; घरफोडीत १.१३ लाखांचा ऐवज चोरी...
Updated: Mar 28, 2026, 09:08 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे मध्यरात्री अंगणात झोपलेल्या महिलेच्या नाकातील सोन्याची नथ चोरट्यांनी काढून नेण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख रक्कमही लंपास केली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनीता गोविंदा पवार व त्यांचे पती गोविंदा पवार हे घराबाहेर अंगणात झोपले होते. २६ मार्च रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे १ वाजताच्या सुमारास अनीता पवार यांना जवळून कोणीतरी गेल्याचा भास झाला. त्या जाग्या झाल्यावर अंधारात दोन अज्ञात इसम पळून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र अंधार व झोपेची गुंगी यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही.
दरम्यान, त्यांच्या नाकातील सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ (अंदाजे किंमत ३५ हजार रुपये) चोरीस गेल्याचे लक्षात आले. पुढे घराची पाहणी केली असता घराचे दार उघडे असल्याचे आढळले. घरातील लोखंडी पेटी उघडून त्यातील रोकडही चोरट्यांनी लंपास केली होती. हरभरा विक्रीतून मिळालेली सुमारे ७८ हजार रुपयांची रक्कम स्टीलच्या डब्यात ठेवलेली होती, तीही चोरीस गेली.
घटनेची माहिती मिळताच त्यांनी मुलगा दिलीप पवार याला फोन करून बोलावले. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला; मात्र चोरट्यांचा कोणताही माग लागला नाही.
या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एकूण १ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची नोंद असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.