लग्नाचे आमिष देत महिलेची फसवणूक; मारहाण करून ७ लाखांचा ऐवज लंपास
Apr 22, 2026, 09:05 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : लग्नाचे आमिष दाखवून एका २९ वर्षीय महिलेची फसवणूक करत तिच्यावर मारहाण करून मौल्यवान दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शेख एफाज शेख अनिस (वय २८, रा. बर्डे प्लॉट) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, १८ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास आरोपीने फिर्यादीला दुचाकीवरून शेगाव रोडवर नेले. तेथे लग्नास नकार देत तिला दुचाकीवरून खाली ढकलले.
यानंतर आरोपीने काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीकडील सोन्याची पोत, दोन अंगठ्या, दोन कानातल्यांचे जोड असा अंदाजे ४ तोळे (किंमत सुमारे ४ लाख रुपये) दागिने आणि घरातील सुमारे ३ लाख रुपये रोख असा एकूण सुमारे ७ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.