सासरच्या छळाला कंटाळून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांना अटक...

 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी प्रवीण मस्के (रा. भुमराळा) हिचा विवाह सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रवीण ब्रह्मानंद मस्के यांच्याशी झाला होता. त्यांना पृथ्वीराज नावाचा एक मुलगा आहे. मागील वर्षभरापासून चारचाकी वाहन खरेदीसाठी माहेरून पैसे आणावेत, यासाठी पती प्रवीण मस्के, सासरे ब्रह्मानंद मस्के, सासू विमल मस्के आणि दीर प्रदीप मस्के हे रोहिणीचा छळ करीत असल्याचा आरोप आहे.
या संदर्भात रोहिणीने आपल्या आई-वडिलांना फोनद्वारे त्रासाबाबत माहिती दिली होती. तिच्या वडिलांनी मस्के कुटुंबीयांना समज देण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र छळ थांबला नाही. अखेर २ मार्च रोजी रोहिणीने राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
मृतदेहाचा अंत्यविधी पार पडल्यानंतर ३ मार्च २०२६ रोजी रोहिणीच्या वडिलांनी बीबी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०८, ८५, ८६ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणात सासरे ब्रह्मानंद मस्के, पती प्रवीण मस्के आणि दीर प्रदीप मस्के यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय रामेश्वर शिंदे हे ठाणेदार भरत चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाच्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.