कोण म्हणतं, मोबाईल हरवला की पुन्हा सापडत नाही? बुलडाणा शहर पोलिसांनी करून दाखवलं!  २६ हरवलेले मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बुलडाणा शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने हरवलेले आणि चोरीला गेलेले एकूण २६ मोबाईल फोन शोधून काढण्यात यश मिळवले असून, सदर मोबाईलचे मूळ मालक शोधून त्यांना परत देण्यात आले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे २ लाख रुपये असून, या कामगिरीबद्दल शहर पोलिसांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

शहरातील विविध भागातून गेल्या काही महिन्यांपासून अनेकांचे मोबाईल हरवले होते. यावर विशेष लक्ष देत पोलीस निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक रवी राठोड यांच्या सूचनेनुसार शोधमोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक रवि मोरे, पोहेकॉ. पांडुरंग साळवे,  सुनील जाधव,  युवराज शिंदे,. विनोद बोरे,. मनोज सोनुने यांनी CEIR पोर्टल व तांत्रिक पद्धतीचा वापर करत हरवलेले मोबाईल शोधले.

मोबाईल शोधलेल्या ठिकाणी नांदेड, अमरावती, जळगाव खानदेश, डेहूरोड, ठाणे, जळगाव राजा, जाफराबाद आणि बुलडाणा शहराचा समावेश होता. काही मोबाईल स्थानिक लोकांकडून परत मिळवण्यात आले. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर दिनांक १७ जुलै २०२५ रोजी एक कार्यक्रम आयोजित करून संबंधित मूळ मालकांच्या उपस्थितीत त्यांना मोबाईल परत देण्यात आले. या कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांनी मोबाईल मालकांना मोबाईल सुपूर्त केले. या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक वाढला असून, हरवलेली वस्तू मिळू शकते यावर विश्वास निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले...