चोट्टा चोर कोण? मुरादपूर मध्ये शेतकऱ्याची तूर चोरली! १८ कट्टे काढून ठेवली होती शेतात....! अंढेरा पोलिसांनो जरा लक्ष द्या...चोरांची हिंमत वाढू देऊ नका...
Jan 19, 2026, 21:03 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यात भुरट्या चोरट्यांची हिम्मत वाढली आहे. चोरटे शेतकऱ्यांच्या शेतमालावर डल्ला मारत आहेत.. कष्टाने घामाने पिकवलेला शेतमाल चोरट्यांच्या नजरेत भरतो..पोलिस करून करून काय करतील? पोलिसांना काय कळणार चोरल्यावर..अशी हिम्मत चोरट्यांची वाढत आहे.. मुरादपूर मध्ये एका मेहनती शेतकऱ्याची तूर चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणाची तक्रार अंढेरा पोलिसांत देण्यात आली आहे. योगेश कैलास इंगळे असे तक्रार देणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, योगेश कैलास इंगळे (वय २३, रा. मुरादपूर, ता. चिखली, जि. बुलढाणा) हे आपल्या कुटुंबासह मुरादपूर येथे राहतात व शेती व्यवसाय करतात. त्यांची मुरादपूर शेतशिवारात गट क्रमांक ७७ मध्ये एक हेक्टर शेतजमीन असून त्या शेतात त्यांनी तुरीचे पीक पेरले होते. तूर पूर्णपणे शेंगांत येऊन काढणीस तयार झाली होती. दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास योगेश इंगळे यांनी हार्वेस्टर (यंत्र) च्या सहाय्याने तुरीची काढणी करून शेतातच १८ कट्टे ठेवले होते. तूर वाळविण्यासाठी तशीच शेतात ठेवण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ५ वाजता शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता, त्यांना तुरीचे कट्टे शेतात दिसून आले नाहीत.
याबाबत त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे चौकशी केली; मात्र कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. अखेर १६ जानेवारी दुपारी १२ वाजता ते १७ जानेवारी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेतातून तुरीचे १८ कट्टे, अंदाजे १२ क्विंटल वजनाची तूर (किंमत सुमारे ६० हजार रुपये) चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.या घटनेबाबत योगेश इंगळे यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.