बलात्कार करणाऱ्या शिक्षकांना कोण पाठीशी घालतय? पीडित महिलेची एसपी पानसरेंकडे धाव! केली "ही" मागणी! मुलाला मार्क वाढवून देतो म्हणत महिलेवर मलकापुरात केला होता बलात्कार....

 
 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तुमच्या मुलाचा पहिला नंबर आणतो, त्याचे मार्क वाढवून देतो असे म्हणत दोन शिक्षकांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना मागील आठवड्यात मलकापुरात समोर आली होती. या घटनेने शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणाच्या तपासावरून पीडित महिलेने तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली आहे. एसपी विश्व पानसरे यांच्याकडे तशी तक्रार देण्यात आली आहे
   पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद आहे की, आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची फिर्याद मलकापूर शहर पोलिसांत दिली होती. उपरोक्त फिर्यादीवरुन पोलिसांनी नुतन विद्यालयातील शिक्षक समाधान इंगळे व अनिल ताठे या दोघा शिक्षकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. सदर गुन्ह्यात आरोपींना अटक देखील करण्यात आले. मात्र, गंभीर गुन्हा असून देखील तपास अधिकारी सपोनि गजानन कौळासे यांनी तपास व्यवस्थित केला नाही. एका दिवसातच तपास पूर्ण झाल्याचे दाखवत विद्यमान न्यायालयात आरोपींना हजर करून पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी मागितली. तत्पूर्वी अत्याचाराची तक्रार देण्यास पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तक्रार घेण्यास टाळाटाळ करुन आरोपींसमोर आपल्यावर दबाब टाकला. एवढेच नाही, तर आरोपींनी पोलिसांसमोर आपल्याना धमक्या दिल्याचे तक्रारीत नमुद असून ठाणेदार गिरी व तपास अधिकारी कौळासे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच पारदर्शक तपास करण्यासाठी तपास अधिकारी बदलुन द्यावा, अशी मागणी देखील पीडितेने केली आहे.