काय सांगता? मोटारसायकल अन् स्कुटी नाही, तर चिखलीतून चोरट्यांनी रातोरात ट्रक दामटला.. 

 

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्ह्यात वाहन चोरींच्या घटना सतत घडत आहेत. यामध्ये दूचाकी चोरींचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु रातोरात चोरट्यांनी चक्क चिखलीतून ट्रकच गायब केल्याची घटना १४ जूनला उघडकीस आली. याप्रकरणी ट्रकमालकाने चिखली पोलिसात तक्रार दिली, यावरून अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

 मोहम्मद नासिर (रा. चिखली) यांनी दोन वर्षांपूर्वी टाटा कंपनीचा एम एच २७ एक्स ८६७७ क्रमांकाचा ट्रक घेतला. तेव्हापासून ते मालवाहतुकीचा व्यवसाय करतात. यासाठी त्यांनी अनिल डोंगरदिवे यांना ट्रक चालक म्हणून कामावर ठेवले आहे. १० जून रोजी धान्याचे साहित्य घेऊन अनिल डोंगरदिवे सोलापूर येथे गेले होते.
यानंतर ११ जूनला सायंकाळी जाफराबाद येथे पोहोचून ट्रकमध्ये खतांचा माल भरला. त्याच रात्री डोंगरदिवे यांनी ट्रक चिखली येथे आणला. चिखली जालना मार्गावरील धनवे हॉस्पिटल जवळ ट्रक उभा करून त्यांनी ट्रक मालक मोहम्मद नासिर यांना माहिती दिली आणि ते तिथून घराकडे गेले. त्यानंतर १४ जून रोजी मोहम्मद नासिर हे मोताळ्यात होते. सकाळी ११ वाजे दरम्यान ट्रकचालक अनिल डोंगरदिवे यांचा त्यांना फोन आला. ११ जूनच्या रात्री तुमचा ट्रक धनवे हॉस्पिटल जवळ उभा केला होता तो आता दिसत नाही आहे. तुम्ही ट्रक घेऊन गेले काय? असे डोंगरदिवे यांनी ट्रक मालकाला विचारले. मी ट्रक नेला नाही असे ट्रक मालक मोहम्मद नासिर यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर दोघांनाही शंका निर्माण झाली. मोहम्मद नासिर मोताळ्याहून निघाले, चिखलीमध्ये ज्याठिकाणी डोंगरदिवे यांनी ट्रक उभा केला होता त्या ठिकाणी ते पोहोचले. तेव्हा त्यांना, ट्रकचालक डोंगरदिवे तिथे दिसले. दोघांनीही ट्रकचा शोध घेतला तरी ट्रक कुठेही आढळला नाही. शेवटी ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात देण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.