बुडालेली बोट काढायला गेला... पण दुसऱ्या दिवशी पाण्यावर तरंगताना सापडला मृतदेह; खडकपूर्णा नदीतील 'त्या' घटनेने वाढवले गूढ!
मृत मजुराचे नाव राजेंद्र अश्रुजी इलग (रा. गुंजाळा, ता. चिखली) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडकपूर्णा नदीपात्रात बुडालेली एक बोट बाहेर काढण्यासाठी २० जुलै रोजी राजेंद्र इलग यांच्यासह चार मजुरांना बोलावण्यात आले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास सर्व मजूर नदीत उतरले. दिवसभर प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास इतर तीन मजूर बाहेर आले. मात्र राजेंद्र इलग नदीपात्रातून बाहेर आलेच नाहीत.
यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. नातेवाईकांनी शोधमोहीम सुरू केली असता दुसऱ्या दिवशी राजेंद्र इलग यांचा मृतदेह बुडालेल्या बोटीच्या जवळ पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.राजेंद्र इलग यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून बीबी पोलीस ठाण्यात नैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्या बोटीला बाहेर काढण्यासाठी मजुरांना नदीत उतरविण्यात आले, ती बोट नेमकी कोणाची होती? तिचा वापर रेती उपशासाठी केला जात होता का? त्या ठिकाणी रेती उत्खननासाठी आवश्यक वैध परवाना, पर्यावरणीय मंजुरी आणि अधिकृत क्षेत्राची परवानगी होती का? तसेच पावसाळ्यात नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढलेला असतानाही मजुरांना पाण्यात उतरविण्याचा निर्णय कोणी घेतला, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर आल्यानंतरच राजेंद्र इलग यांच्या मृत्यूमागील नेमके सत्य आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे.