फवारणीसाठी पाणी आणायला गेला... पण परतलाच नाही! जिगावच्या २३ वर्षीय शेतकरीपुत्राचा पाण्यात बुडून मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे नाव उमेश भानुदास तितरे (वय २३, रा. जिगाव) असे आहे. उमेशच्या शेतात फवारणीचे काम सुरू होते. त्यावेळी तो जिगाव शेतशिवारातील गट क्रमांक १५ जवळील पंप हाऊसमधून प्लास्टिकच्या कॅनने पाणी आणण्यासाठी गेला होता.
बराच वेळ होऊनही उमेश परत न आल्याने त्याचा नातेवाईक राहुल अनिल आडे यांनी पंप हाऊसजवळ जाऊन पाहणी केली. त्यावेळी पाण्यावर उमेशची चप्पल आणि प्लास्टिकची कॅन तरंगताना दिसली. संशय आल्याने शोध घेतला असता उमेशचा मृतदेह पाण्यात आढळून आला.
ग्रामस्थांच्या मदतीने त्याला तत्काळ पाण्याबाहेर काढून नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी राहुल अनिल आडे यांच्या माहितीवरून पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये मर्ग दाखल केला असून, पुढील तपास पोहेकॉ खोंदील करीत आहेत.