पाय धुण्यासाठी खदाणीत उतरले अन् काळाने घाला घातला! देऊळगाव माळीजवळ दोन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; कोराडी प्रकल्प परिसरात शोककळा

 
 मेहकर (अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा);पाय धुण्यासाठी पाण्यात उतरलेले दोन चिमुकले खोल पाण्यात बुडाले आणि काही क्षणांतच सर्व काही संपले... देऊळगाव माळी गावाजवळील कोराडी प्रकल्प परिसरात शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडलेल्या या हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पाणीपुरवठा विहिरीजवळील खदाणीत बुडून आयान राजू शेख (वय अंदाजे १० वर्षे, रा. देऊळगाव माळी) आणि त्याचा मावसभाऊ आवेद इब्राहिम शेख (वय अंदाजे ११ वर्षे, रा. लोणार) या दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर देऊळगाव माळीसह परिसरावर अक्षरशः शोककळा पसरली आहे.

पाय धुण्यासाठी गेले अन् खोल पाण्यात बुडाले...

मिळालेल्या माहितीनुसार, आयान आणि आवेद हे शेख आसिफ शेख हुसेन यांच्यासोबत कोराडी धरण परिसरात आले होते. धरणाच्या पाण्यालगत पाणीपुरवठ्यासाठी अंदाजे १५ बाय ४५ आकाराची खदाण खोदण्यात आली आहे. या खदाणीत धरणाचे पाणी साचलेले आहे.पाण्याची खोली लक्षात न आल्याने दोन्ही मुले तेथे पाय धुण्यासाठी उतरली. मात्र, खदाण खोल असल्याने आणि आतील बाजूस कपार असल्याने दोन्ही मुले अचानक खोल पाण्यात ओढली गेली. काही कळण्याच्या आतच ती पाण्यात बुडू लागली.

वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; एका मुलीला वाचवले, पण...

मुलांना बुडताना पाहताच शेख आसिफ शेख हुसेन यांनी त्यांना वाचविण्यासाठी तातडीने शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्यासोबत असलेल्या एका मुलीला वाचविण्यात त्यांना यश आले. मात्र, आयान आणि आवेद यांना वाचविणे शक्य झाले नाही.
घटनेची माहिती गावात पोहोचताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. खदाणीत बुडालेल्या दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, खदाणीत मोठ्या प्रमाणात पाणी आणि खोली अधिक असल्याने शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

अंधारामुळे शोधकार्याला अडथळा; NDRF पथकाला पाचारण

घटनास्थळी पोलीस कर्मचारी, मंडळ अधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ दाखल झाले असून मदत व शोधकार्य सुरू आहे. घटनेची माहिती NDRFच्या विशेष पथकाला देण्यात आली आहे.मात्र, रात्रीचा अंधार आणि खदाणीत असलेली पाण्याची खोली यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. NDRFचे पथक रविवारी सकाळी घटनास्थळी पोहोचणार असल्याची माहिती पथक प्रमुखांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर...

खेळण्याच्या, बागडण्याच्या वयातील दोन चिमुकल्यांचा अशा दुर्दैवी पद्धतीने अंत झाल्याने देऊळगाव माळीसह लोणार आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काही क्षणांपूर्वी डोळ्यांसमोर असलेली मुले अचानक पाण्यात नाहीशी झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.कोराडी प्रकल्प परिसरातील या घटनेने जलसाठ्यांच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.