जलवाहिनी फोडल्याने सिंदखेडराजाचा पाणीपुरवठा विस्कळीत; दोषींवर कारवाईचा इशारा...

 
 सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ग्रामीण भागातून शहराकडे येणारी जलवाहिनी वारंवार फोडल्या जात असल्याने शहरातील नियमित पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पालिकेने संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
शहराला संत चोखासागर (खडकपूर्णा) धरण येथून पाणीपुरवठा केला जातो. या योजनेची मुख्य जलवाहिनी असोला जहांगीर शिवारातून जाते. या परिसरात जलवाहिनी फोडून शेतीसाठी पाणी घेत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. वारंवार सूचना देऊनही प्रकार थांबत नसल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याची माहिती देण्यात आली.
घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह असोला शिवारातील गळतीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसान करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला.
दरम्यान, पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.