पोलीस असल्याचे सांगून दागिने लुटणारा ‘वायरस’ LCB च्या जाळ्यात; पाच गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल जप्त.....

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिलांना फसवून पोलीस असल्याची बतावणी करत दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या ‘वायरस’च्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या असून, त्याच्याकडून पाच गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल २ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दुसरा एक साथीदार फरार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयित आरोपींचा माग काढण्यात यश आले. यातील एकाला – अंकुश उर्फ 'वायरस' गणेश देशमुख याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची सखोल चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान ‘वायरस’ने बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या पाच गुन्ह्यांची कबुली दिली. यात जलंब पोलीस ठाणे हद्दीतील दोन, जळगाव जामोद येथील एक, खामगाव शहरातील एक आणि शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एक गुन्हा समाविष्ट आहे.
पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ३७ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने, बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल, तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण २ लाख ९२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोहेकॉ. एजाज खान, पो.ना. अनंता फरताळे, पो.कॉ. अजित परसुवाले, मंगेश सनगाळे, निवृत्ती पुंड, राज आडवे, कैलास ठोंबरे यांचा मोलाचा सहभाग होता.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दरम्यान, दुसरा आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांनी पोलीस असल्याचे भासवणाऱ्या अनोळखी व्यक्तींविषयी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.