डोणगावात अवैध उत्खननाचा बळी! ट्रॅक्टर उलटल्याने अल्पवयीन चालकाचा मृत्यू; वाहन ताब्यात देणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल...
अवैध उत्खनन माफियांचे ‘रात्रीचे राज्य’
डोणगावमध्ये रात्र झाली की अवैध उत्खनन करणाऱ्यांसाठी जणू दिवस उगवतो, अशी स्थिती आहे. कमी पैशात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलांचा ट्रॅक्टर चालक म्हणून वापर, तर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे लोकेशन देण्यासाठी मोटारसायकलवर फिरणारी युवकांची टोळी, असा संपूर्ण साखळीदार प्रकार उघडपणे सुरू असल्याचा आरोप होत आहे.विशेष म्हणजे, रात्री अपरात्री गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर सर्रास दिसत असताना, रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलीस प्रशासनाला ही वाहने कशी दिसत नाहीत? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
‘शर्यत’ लावून उत्खनिज वाहतूक?
चर्चेनुसार, आरेगाव रस्त्यावरील एका बांधकामासाठी रात्री ११ वाजेपासून ट्रॅक्टरची रांगच लागलेली होती. कोण आधी गौण खनिज टाकण्याच्या ठिकाणी पोहोचतो, यासाठी चालकांमध्ये शर्यत लागल्याचेही बोलले जात आहे. यामुळेच हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सीसीटीव्हीत सगळे कैद, तरी कारवाई कुठे?
डोणगावमधील कित्येक ले-आऊट व घरबांधकाम ठिकाणी अवैध गौण खनिज खुलेआम टाकले जात आहे. गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रात्री-बेरात्री फिरणारी वाहने व लोकेशन देणारे युवक स्पष्टपणे कैद झालेले आहेत, असे असतानाही ठोस कारवाई का होत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महसूल–पोलीस प्रशासनावर संशयाची सुई
मागील काही दिवसांत तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अप्पर तहसीलदार डोणगावमध्ये येतात; मात्र त्यांचा लोकेशन आधीच माफियांपर्यंत पोहोचतो, अशी गंभीर चर्चा आहे. त्यामुळे कारवाईआधीच उत्खनन थांबवले जाते व पुन्हा रात्री सुरू होते, असा आरोप होत आहे.
सखोल चौकशीची मागणी
या अपघातामागे अल्पवयीन चालक एकटाच होता की आणखी ट्रॅक्टर सोबत होते? कोणत्या बांधकामासाठी उत्खनिज नेले जात होते? माफिया साखळी कोण चालवत आहे? याची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. एक अल्पवयीनाचा जीव गेल्यानंतरही जर प्रशासन जागे झाले नाही, तर डोणगावमधील अवैध गौण खनिज माफिया राज आणखी किती बळी घेणार? हा प्रश्न आता थेट जनतेतून विचारला जात आहे.