केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या कारला भीषण अपघात! तिघे गंभीर जखमी; समृद्धी महामार्गावर झाला अपघात, कारचा चुराडा झाला...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. समृद्धी  महामार्गावर मालेगावजवळ हा अपघात झाला, या अपघातात प्रतापराव जाधव यांच्या अंगरक्षकासह तिघे जखमी झाले आहेत. रविवारच्या रात्री हा अपघात झाला, या अपघातात ना.जाधव यांच्या कारचा चुराडा झाला आहे..केंद्रीय मंत्री ना.जाधव यांना नागपूर विमानतळावर सोडून कार मेहकरकडे परत येत होती..
प्राप्त माहितीनुसार ना.जाधव यांना नागपूर विमानतळावर सोडल्यानंतर चालक भूषण चोपडे, अंगरक्षक निलेश वाकुडकर आणि सहकारी वैभव देशमुख असे ना.जाधव यांच्या मालकीच्या एम एच २८, ००७७ या कारने मेहकरला परत येत होते. मालेगाव जवळ मुंबईकडून येणाऱ्या एका ट्रकने अचानक यू टर्न घेतला त्यामुळे कार आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.. जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ना.जाधव दिल्लीचा दौरा रद्द करून परत आले, त्यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.