दुर्दैवी ! विहीर बांधकाम करतांना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू; २४ तासानंतर बाहेर काढला मृतदेह! खामगावची घटना
Jun 17, 2026, 13:18 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): विहिरीचे बांधकाम सुरू असताना एका तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. खामगाव येथे नव्याने सुरू असलेल्या खाजगी कृषी बाजार समितीच्या मागे सजनपुरी शिवारात ही घटना घडली. प्रशासनाकडून मदत कार्यात विलंब झाल्यामुळे तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल २४ तास लागले. आज,१७ जूनच्या सकाळी तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
भगवान महादेव दांदळे असे मृतक तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार काल सकाळी १० वाजेच्या सुमारास विहिरीचे बांधकाम करत असताना भगवान तोल जाऊन विहिरीत पडला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या.
दरम्यान प्रशासनाकडून मदत कार्यात विलंब होत असल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामस्थांनी खामगावात रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर पाणी उपसण्याचे काम सुरू केले. अखेर २४ तासानंतर आज अखेर भगवानचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.