अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी आरोपी काकाला २० वर्षांची शिक्षा; बुलढाणा पोक्सो न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!
प्रकरणातील माहितीनुसार, पीडिती ही आरोपीची पुतणी आहे. आरोपी काका सतिष खंडारे याने ३ एप्रिल २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास घरात कोणीही नसल्याची संधी साधून पीडित अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच, घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही आरोपीने घरात कोणी नसताना पीडितेवर वारंवार अत्याचार केले. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिली. काही दिवसांनी आईने विचारपूस केली असता पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी केला. तपासादरम्यान आवश्यक पुरावे गोळा करून आरोपीविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संतोष मुलचंद खत्री यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडिता आणि तिच्या आईची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. इतर साक्षीदारांनीही सरकारी पक्षाला सहकार्य केले.
सर्व साक्षी-पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेऊन विशेष न्यायाधीश रविकुमार केशरमल शर्मा यांनी आरोपी सतिष शंकर खंडारे याला दोषी ठरवले. पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, भारतीय दंड विधानाच्या कलम ५०६ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. पोक्सो कायद्यांतर्गत विशेष शिक्षा सुनावण्यात आल्याने भारतीय दंड विधानाच्या इतर कलमांखाली स्वतंत्र शिक्षा न देता सर्व शिक्षा एकत्र भोगावयाच्या असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. याशिवाय, दंडाची संपूर्ण तीन हजार रुपयांची रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲड. संतोष मुलचंद खत्री यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी सक्षम तपास केला, तर न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक फौजदार शेखर थोरात यांनी मोलाची भूमिका बजावली.