भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले! परीक्षा द्यायला निघालेल्या एकलारा येथील तरुणाचा मालगणी फाट्यावर मृत्यू..
Feb 12, 2026, 11:45 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली बुलढाणा रस्त्यावरील मालगणी फाट्याजवळ आज, १२ फेब्रुवारीच्या सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुचाकी आणि ट्रकच्या या अपघातात चिखली तालुक्यातील एकलारा येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शंतनु नारायण अंभोरे(२१) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार शंतनु मोटार सायकलने परीक्षेसाठी बुलढाण्याकडे येत होता. यावेळी ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने शंतनुचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.
अपघातात कारणीभूत ठरलेला ट्रक आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.